4/09/2016

डिफायन्स (Defiance) - समूह आणि नेत्याच्या जडणघडणीचा आलेख

आपण कित्येकदा स्वतःच्या इच्छेने किंवा इच्छेविरूद्ध एखाद्या समूहाचा भाग बनतो. मुळात सामाजिक प्राणी हे विशेषण मिरवणारा कुठलाही प्राणी तसे करतो, पण माणसाच्या बाबतीत त्या क्रियेमागे भावनिक, मानसिक, आर्थिक, राजकीय किंवा निव्वळ भीती असे अनेक कंगोरे असू शकतात. मानवी समूह हे मानवी इतिहासामधल्या प्रत्येक मोठ्या उलाढालीमागचं एक महत्वाचं कारण आहे. आजही ‘मानवी समूहाचं मानसशास्त्र’ ह्या विषयावर शेकड्यानं ग्रंथ पडूनही त्यामागचं गूढ उकललेलं नाही. एअरपोर्टवर विमानाला उशीर झाल्याने रात्रभर अडकलेले प्रवासी किंवा ट्रॅफिक जॅममध्ये मध्यरात्री हायवेवर अडकलेले लोक, किंवा मुसळधार पावसामुळे भरदिवसा शहराच्या एखाद्या भागात अडकून पडलेले लोक. किती वेगवेगळी कारणं आणि किती वेगवेगळे व्यवहार, वेगवेगळ्या पद्धतीचे मनोव्यापार. पण माणूस हा फार हुशार प्राणी आहे. एखादी गोष्ट पूर्ण आकलन होत नसेल तरीही तो त्याचं ढोबळमानाने एक चित्र बनवतोच. Framework किंवा रचनात्मक मांडणी म्हणूया. शेकडो विविध प्रसंगांच्या अभ्यासातून एक ढोबळ मांडणी समजून घेणं आणि पुन्हा ती तशीच कायम किंवा अधिकतर वेळेस घडते हे सिद्ध करणं. समूहाच्या अभ्यासातून ब्रूस टकमन (Bruce Tuckman) मानसशास्त्रज्ञानं समूह विकासाचे टप्पे मांडले. “Forming – Storming – Norming – Performing” हे ते चार टप्पे. म्हणजेच, पहिल्यांदा समूह बनतो – संघटन, मग त्यामध्ये घर्षण निर्माण होतं, विविध स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि विचारांमुळे – घर्षण, मग हळूहळू समूहाचे स्वतःचे नियम आणि मूल्यव्यवस्था तयार होते – नियमन आणि मग तो समूह त्याच्या सर्वोच्च कार्यक्षमतेपर्यंत पोचतो – संचलन.
एव्हढं पुराण लावण्याचं कारण असं की, Defiance नामक एका सिनेमामुळे कॉलेजात शिकलेलं हे सर्व पुन्हा अधोरेखित झालं आणि सिनेमा ह्या माध्यमाची अचाट क्षमता पुन्हा नव्याने माझ्या समोर आली. Defiance हा सिनेमा मुळात नाझी, ज्यू, दुसरं महायुद्ध ह्या अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच वापरून गुळगुळीत झालेल्या विषयावरचा सिनेमा आहे. ह्या विषयामागची वेदना एव्हढी तीक्ष्ण आहे की पुन्हा पुन्हा त्याच त्याच घटना पाहूनही त्यामागची भयाणता जाणवत राहते, ती बोथट होत नाही. पण तरीही निरनिराळे कंगोरेसुद्धा अनेक सिनेमांनी तपासलेत आणि त्यात यशस्वीसुद्धा झालेत. Defiance काही फार नावाजला गेला नाही. त्याच्या कथेच्या ऐतिहासिक सत्यतेबद्दलदेखील प्रवाद आहेत, पण तरीही Defiance मला आवडला तो त्याच्या रचनेमुळे आणि त्यामागच्या सत्यकथेमुळे.
सध्याच्या बेलारूसमध्ये असलेलं आणि त्याकाळी पोलंडमध्ये असलेल्या श्तानकियेविच (Stankiewicze) ह्या छोट्याशा गावातल्या बिएल्श्की (Bielski) बंधूंची ही सत्यकथा. नाझींनी पोलंड व्यापल्यावर ते पूर्व सीमेकडे म्हणजेच रशियाकडे निघाले आणि जाताना सर्व ज्यूंचं शिरकाण करत. स्थानिक ज्यू नसलेल्या पोलिसांना किंवा नागरिकांना आमिष दाखवून किंवा जीवाची भीती दाखवून ज्यूंचे ठावठिकाणे शोधून त्यांना संपवत नाझी पुढे निघाले होते. श्तानकियेविचमधल्या पोलिसांनी बिएल्श्की बंधूंच्या घराबद्दल माहिती दिली आणि नाझींनी तिथे रक्ताची होळी केली. दोन थोरले भाऊ दुसर्या शहरात (तुव्हिया आणि झुस) आणि दोन धाकटे घरी (अझाएल आणि आरोन). त्यातला झुस घरी असतो आणि अझाएलसोबत नेमका त्या वेळी जंगलात गेलेला. धाकटा आरोन कपाटातल्या फळीखाली लपून बसतो. तीन भाऊ पळून जंगलात जातात आणि झालेल्या घटनेची बातमी ऐकून थोरला तुव्हियादेखील त्यांना शोधत त्यांना येऊन मिळतो. चार बिएल्श्की बंधूंच्या संघर्षाची कहाणी इथून सुरू होते.
स्वतःच्या जेवणाची सोय करताना दमछाक होत असताना नाझींच्या भीतीनं नालिबोकी जंगलामध्ये पळून आलेली अनेक ज्यू कुटंबं त्यांना भेटू लागतात. तंदुरूस्त आणि निर्णयक्षम बिएल्श्की बंधू आपोआपच त्यांचं नेतृत्व स्वीकारत जातात. इतरांबद्दल सहानुभूती असणारे आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःचा विचार न करणारे तुव्हिया आणि अझाएल आणि सहानुभूती असूनही स्वतःचा आधी विचार करणारा झुस ह्यांच्यातले वैचारिक मतभेद हळू हळू समोर येऊ लागतात. थोरला असल्याने तुव्हिया अधिकारवाणीनं वागणारा पण बंडखोर वृत्तीचा झुस स्वतःला कुठेही कमी न लेखणारा. तुव्हिया एक असं कृत्य करतो ज्यामुळे त्याला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या नैतिकतेबद्दल शंका येऊ लागते. खाणारी तोंडं वाढत असतात, त्यातच किरकिरणारी तोंडंसुद्धा. आपण घाबरून लपत राहण्यापेक्षा लढावं असं झुसचं म्हणणं, तर आपण माणसांप्रमाणे जगून नाझींचा बदला घ्यावा असा तुव्हियाचा विचार. एका सशस्त्र हल्ल्यामध्ये काही मित्र गमावल्यावर तुव्हियाचा विचार पूर्ण पक्का होतो पण झुस अजूनही सशस्त्र लढ्यावर ठाम असतो. स्त्री आणि लहान मुलं असलेल्या समूहाला तुव्हियाचा मार्ग जास्त प्रशस्त वाटत असतो. अशातच तुव्हिया आणि झुसला रशियन क्रांतिकारक गट भेटतो. हे गट सोव्हिएत रेड आर्मीचेच विस्तारित गट असतात आणि ते नाझीविरोधी सशस्त्र कारवाया करून त्यांना मागे पाठवण्याच्या प्रयत्नात असतात. तुव्हिया आणि झुसचा समूह आजूबाजूच्या शेतकर्यांकडून सामान आणूनच जगत असतो, पण बरेच शेतकरी नकार देत असतात, काहीजण तर पोलिसांनाही कळवत असतात. शेतकर्यांच्या नकाराचं एक कारण म्हणजे रशियन गटही त्यांच्याकडून सामान घेत असतो. अशात तुव्हिया आणि झुस रशियन गटाशी समझोता करतात. तुम्ही कोण असा प्रश्न रशियन प्रमुखानं विचारल्यावर हे दोघे “बिएल्श्की ऑत्रिआद” (बिएल्श्की क्रांतिकारी गट) असं उत्तर देतात. त्यावर “ज्यू लढत नाहीत, ते फक्त धंदा करतात, चर्चा करतात, अभिजनवादी असतात.” असं रशियन प्रमुखानं म्हटल्यावर, “आम्ही लढणारे ज्यू आहोत.” असं उत्तर ते देतात. रशियन प्रमुखाला त्यांचं कौतुक वाटतं आणि तो त्यांना थोडं सामान मिळवण्याची परवानगी देतो. त्यानंतर तुव्हियाच्या बचावाच्या पावित्र्याला कंटाळून झुस रशियन गटाला योद्धा म्हणून सामिल व्हायला निघून जातो.
हे नमुन्यादाखलचे काही प्रसंगसुद्धा नेतृत्वगुण, समूहाचं मानसशास्त्र, समूहातला अंतर्गत संघर्ष, त्यांची स्वतःची मूल्यव्यवस्था बनण्याची प्रक्रिया ह्याबद्दल प्रचंड मोठं भाष्य करतात. झुस गेल्यानंतरदेखील तुव्हियाच्या नेतृत्वाला आव्हानं मिळतात. तुव्हियाचा स्वतःवरचा डळमळीत झालेला विश्वास आणि पसरलेली साथ ह्यामध्ये तुव्हियाच्या हातनं दोरी सुटून समूहामध्ये अराजक माजणार असं वाटतानाच तुव्हियानं घेतलेला निर्णय आणि त्याच्या कृतीमुळे उमटणारे चांगले वाईट पडसाद, जगण्याचा सुरू असलेला अविरत संघर्ष आणि समूहातल्या इतरांचे स्वार्थ, वृत्ती अशा विविध खाचाखळगांतून ह्या गटासोबत आपलाही प्रवास सुरू राहतो.
बिएल्श्की बंधू युद्धानंतरही त्यांची कथा सांगायला बरीच वर्षं जिवंत राहिले. त्यांच्या गटातली काही माणसंही. पण त्यांच्या कथांवर बरेच वाद-प्रवाद अस्तित्वात आहेत. बिएल्श्की बंधूंच्या शौर्यावर कुणालाच शंका नाही पण त्यांनी केलेली काही कृत्य वेगवेगळ्या नैतिक निकषांवर खरी राहतीलच असं नाही. युद्धस्थितीमध्ये शेकडो माणसांना घेऊन इकडून तिकडे जीव वाचवत फिरणार्‍या मंडळींना किती नैतिक कसोट्या लावायच्या हा ही एक प्रश्नच आहे. पण अर्थात ती माणसं होती, देव नव्हेत हे ही विसरून चालत नाही.
सिनेमा त्याने मान्य केलेल्या कथावस्तूला प्रामाणिक राहून व्यक्तिमत्व घडवत जातो. डॅनियल क्रेग (तुव्हिया) आणि लिएव्ह श्रायबर (झुस) ह्यांच्यातला छुपा संघर्ष, पण तरीही भावाभावांमधलं प्रेम आणि विश्वास वेगवेगळ्या प्रसंगांमधून व्यवस्थित व्यक्त होत जातो. ऐतिहासिक मूल्य विवादित असतं तरीही सिनेमामधलं समूहाचं मानसशास्त्र आणि समूहाच्या व्यवहारांमागच्या उलाढाली सिनेमा वेगळ्या पातळीवर घेऊन जातात. चित्रीकरण आणि संकलन वगैरे बाबींमध्ये सिनेमा अर्थातच उजवा आहे. कथा एक धागा पकडून निश्चित केल्यामुळे प्रसंगी सरधोपट होते, पण तरीही मूळ कथेतलं नाट्यच इतकं मोठं आहे की कुठेही सिनेमा कंटाळवाणा होत नाही. बेलारूसचं निसर्गसौंदर्य बेलारूसशी जोडून असलेल्या लिथुआनियामधून व्यवस्थित पुढे येतं. जंगलाचं अथांग अस्तित्व आणि अवाढव्य झाडांच्या आश्रयाला आलेली तुटपुंजी माणुसकी विरोधाभासी चित्र सुंदर उभं करत जाते.
डॅनियल क्रेग हा माझा आवडता अभिनेता आहेच आणि इथेही तो निराश करत नाही. तुव्हियाच्या घालमेलीपासून ते नेता म्हणून लागणारा कणखरपणा प्रसंगी ओढूनताणून आणतानाच्या विविध मनोवस्था तो उत्तम पकडतो. लिएव्ह श्रायबर झुसची आक्रमक व्यक्तिरेखा उत्तम अभिनय आणि त्याच्या दणकट व्यक्तिमत्वाच्या जोरावर निभावून नेतो. अझाएलच्या भूमिकेतला जेमी बेलही छाप सोडतो. मार्क फ्युएरश्टाईन (‘Royal Pains’ मधला डॉक्टर हॅन्क), इशाक मालबिन ह्या व्यक्तिरेखेच्या बाबत कमाल करतो. ही काल्पनिक व्यक्तिरेखा असावी, एका ज्यूईश विचारवंताची. त्याच्या एन्ट्रीपासूनच त्याचं विचारवंत असणं आणि कामकरी नसणं ह्याचा एक बॅकड्रॉप प्रत्येक प्रसंगाला येतो आणि बरेचदा हलकी विनोदनिर्मितीही होत राहते.
एकंदरित डिफायन्समुळे माझी समूहाच्या चलनवलनाबद्दलच्या विविध सिद्धांतांची उजळणी झाली आणि मजा आली. एक माहित नसलेली कथा कळली. एका थोडंफार वाचलेल्या देशाबद्दल (बेलारूस) पुन्हा एकदा वाचण्याचा योग आला. सिनेमा म्हणून डिफायन्स अगदी मास्टरपीस नसला तरीही तो माझ्या मते बराच वरचा आहे तो प्रसंगांच्या जडणघडणीमुळे. डॅनियल क्रेगच्या जीव तोडून केलेल्या अभिनयासाठी आणि मानवी समूह कसे घडत जातात ह्याचं जिवंत चित्रिकरण केवळ अप्रतिम प्रसंगांच्या माध्यमातून केलेलं पाहण्यासाठी नक्की पहावा असा सिनेमा.
सिनेमाचं यश बरेचदा ह्यातच मानलं जातं की तो किती प्रश्न उभे करतो. डिफायन्स ह्या ही बाबतीत मागे पडत नाही. तुव्हियाचे नैतिकतेचे आडाखे आणि मापदंड हे त्याला सोयीस्कर असे आहेत का? समूहाची मूल्य आणि नेत्याची मूल्य कायम एकसमानच असावीत का? की समूह हा नेत्याच्या मूल्यांवरूनच स्वतःची मूल्य घडवतो? नक्की नैतिक आणि अनैतिकतेची व्याख्या काय? बिएल्श्की कुटुंबाला नाझींच्या हवाली करणार्या पोलिसांनी स्वतःच्या कुटुंबाचा आधी विचार करणं नैतिक की अनैतिक? किंवा बिएलश्की बंधूंना गुपचूप मदत करणार्या गावकर्याची मूल्यं जरी उच्च असली तरी त्यानं नसत्या फंदात पडून जीव धोक्यात घालू नये म्हणून आदळआपट करणारी त्याची बायको चूक कशी? तुव्हिया आणि झुस दोघांचीही विचारपद्धत किंवा नेतृत्व करण्याची पद्धत बरेचदा उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त उभे करते पण तरीही त्या परिस्थितीमध्ये कितीही शंकास्पद वाटली तरी प्रभावी होती हे पुराव्यांनीशी सिद्ध होतंच. त्यामुळे जेव्हा पुस्तकी व्याख्यांकडे पाहून विचारवंत आणि बुद्धिवादी योग्य-अयोग्य आणि नैतिक-अनैतिकांचे शाब्दिक कीस पाडत बसतात, तेव्हा कृती करणारे चूक की बरोबर हे परिस्थितीनुसारच ठरत असतं. सिनेमातही जंगलात बसून बुद्धिवादी आणि विचारवंत जेव्हा चर्चा करतात तेव्हा त्यातला फोलपणा त्यांनाही कसा जाणवत जातो ह्याचा एक उत्तम प्रसंग आहे. थोडक्यात, कुठलीही व्याख्या ही संपूर्ण नसून परिस्थितीनुसार घडत जाते हे समाजातील बुद्धिवादी आणि विचारवंतांनीही समजून घ्यावं का अशा अर्थाचे प्रश्न सिनेमा थेट उभे जरी करत नसला तरी त्यातल्या प्रसंगांनी डोक्यात तरी निश्चितच उभे राहतात.

No comments:

Post a Comment