5/15/2012

मृत्युदाता -१५

भाग -१भाग -२भाग -३भाग -४भाग -५भाग -६भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११, भाग -१२, भाग -१३ आणि भाग -१४ पासून पुढे


"जसं घडायला हवं होतं तसं सर्व घडतंय रमेश." फोनवर पलिकडून आवाज आला.
"ह्म्म."
"कमिशनरांना अजून आम्हाला हे ठाऊक असल्याचा संशय आलेला नाही ना?"
"वाटत तरी नाही. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे." रमेश आवंढा गिळत म्हणाला.
"गुड. तसंही तुम्ही त्यांच्यासाठी जे करताय तेच आम्हालाही हवंय."
"ते सर्व ठीक आहे. पण मी हे जे सर्व करतोय त्याबदल्यात जे मला वचन दिलं गेलंय ते पूर्ण होणार की नाही ह्याच्यावर माझा विश्वास राहिलेला नाही. कारण फाट्यावर फाटे फुटत चाललेत कामांना पण तुमची सुरूवातीची फाईल सोडली तर बाकी काही ठोस मला दिसत नाही."
"मिळेल रमेश. मिळेल. तुम्ही काम उत्तमरीतीने करताय ह्याची परतफेड म्हणून एक अत्यंत महत्वाची गोष्ट लवकरच तुमच्याकडे पाठवू, म्हणजे तुमचा आमच्यावर पक्का विश्वास बसेल." समोरून हसतहसत उत्तर आलं.
रमेशनं फोन बंद केला. आणि सोफ्यावर भिरकावला. अंग सोफ्यावर झोकून दिलं आणि पुन्हा विचारात गढून गेला. 'आधी रतनला शोधण्याची असाईनमेंट, त्यात फाटा फोडून कोल्हेवर नजर ठेवायची आणि आता तर कोल्हेला एक्सपोज करायचं, नक्की काय सुरू आहे ह्या लोकांचं? आणि माझ्या प्लॅनचं काय होणार? एकदा रतनला पकडलं की मी राजे आणि डॉ. काळेंच्या खुन्याला गाठणार होतो, ते कसं जमणार आता? आता ते जवळपास अशक्यच झालंय. आणि मी मात्र ह्यांच्या जाळ्यात पुरता अडकलोय.'


-----


खोलीत हलकीशी हालचाल झाल्याबरोबर नरेंद्र उठून झडप घालण्याच्या पवित्र्यात आला.
"मीच आहे रे." कल्पना हसून म्हणाली.
नरेंद्रनं पवित्रा सोडला.
"तुझा अजून माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना."
"दगाफटका करून घेऊन आलीयस इथे, विश्वासाची अपेक्षा कशी करतेस?" तो बसत म्हणाला.
"सरळ बोलावलं असतंस तर आला असतास?"
"इथे यायची माझ्या मते गरजच नव्हती."
"बरं सोड तो मुद्दा. तू ऐकायचा नाहीस. पण रेखाला पटलंय."
"काय? काय केलंस तिच्याबरोबर?" नरेंद्र काळजीत पडला.
"काही केलं नाहीये. आम्ही बोललो रात्री बराच वेळ. बरंच काही सोसलंय तिनंसुद्धा."
"तिनं तुला सगळं सांगितलं?" नरेंद्रचा आश्चर्याचा भर ओसरत नव्हता.
"सगळं नसेल कदाचित, पण बरंच. कारण तिनं मारल्यामुळे माझी रेल्वे स्टेशनवरची दोन माणसं आडवी झाली असल्यानं मला तिच्याबद्दल बरंच कुतूहल वाटलं. त्यातून तिच्यात असं काय दिसतं तुला, जे माझ्यात नाही ते ही पाहायचं होतं."
"हा एखाद्या भिकार सिनेमातल्या संवादासारखा संवाद नाही वाटत आहे तुला?"
"तू सिनेमे कधी पाहिलेस?"
"आणि तू कधी पाहिलेस?"
"मी सिनेमाबद्दल बोलले नाही. तू बोललास."
"पण सिनेमासारखं तू बोललीस."
"इनफ." कल्पना जराशी जोरातच बोलली. आणि एकदम तिच्या डोळ्यांत पाणी आलं. "आपण असेच बोलत, भांडत राहायचो आठवतं?"
नरेंद्रनं नजर तिच्यावरून हटवली आणि तो शून्यात पाहू लागला.
"असो. तू तयार हो. हे दोघेजण थोडावेळ मुख्य दारापाशी जाऊन उभे राहतील घराच्या. मग त्या पलिकडच्या खोलीत काहीतरी खायला ये."
"हे काय हॉटेल म्हणून चालवते आहेस का आता?" नरेंद्र तिच्या अघळपघळपणानं वैतागला होता. "मला निघायचंय लगेच. खाण्यापिण्याला वेळ नाहीये."
"पण मला भूक लागलीय." दरवाज्यातून रेखा असं म्हणत आत आली.
नरेंद्रकडे बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं.


-----


रमेशनं घड्याळाकडे परत एकदा पाहिलं आणि मग आतल्या खोलीकडे गेला. दार उघडलं आणि आतमध्ये बांधून ठेवलेल्या मेकॅनिककडे एक नजर टाकली. त्याच्या तोंडात बोळा होता. तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता. गयावया करत होता. रमेशनं दरवाजा पुन्हा लाऊन घेतला आणि एक फोन लावला.
जवळपास अर्ध्या तासाने त्याच्या घराची बेल वाजली. रमेशनं दार उघडलं. समोर साध्या कपड्यांमध्ये सिन्नरकर उभे होते. ते आत आले आणि रमेशनं बाहेर आजूबाजूला पाहून मग दरवाजा लावून घेतला.
"अचानक काय झालं एव्हढं?" सिन्नरकरांनी विचारलं.
रमेश त्यांना आतल्या खोलीकडे घेऊन गेला. दरवाजा उघडला आणि आत शिरला. मागोमाग सिन्नरकर आले आणि त्यांचे डोळेच विस्फारले.
"कोण आहे हा?"
"वकार. ह्युमन ट्रॅफिकर कम इमिग्रेशन एक्सपर्ट."
"म्हणजे?"
"कोल्हेचा कॉन्टॅक्ट. ज्याच्यामार्फत त्यानं वर्तकची बायको अन क्षीरसागरचं कुटुंब मलेशिया आणि थायलंडला पाठवलं."
"काय?" सिन्नरकरांसाठी हा धक्का होता.
"होय. आता कोल्हेनं पैसे खाल्ले ह्याचा काही पुरावा उरला नाही. अर्थात, त्याच्या खात्यांची चौकशी होऊ शकते. पण बिनापुरावा आपण अशी चौकशी सुरूही करू शकत नाही."
"मग?"
"आता फक्त इंगोलेच काहीतरी करू शकतात."
"ते ही शक्य नाहीये." सिन्नरकरांचा चेहरा पडला.
"का?"
"कोल्हेनं आजच सकाळी क्षीरसागर मर्डर केसमध्ये ऍरेस्ट केला आहे. इंदूरमधल्या पॉश रेस्टॉरंटचा मालक वर्मा म्हणून आहे. त्याच्या घरी मर्डरवेपन आणि मर्डर झाला त्या हॉटेलातल्या सिक्युरिटी टेप्सही मिळाल्यात. वॉटरटाईट केस आहे. आता कोल्हे कुणालाच अजून ब्लॅकमेल करण्याची शक्यता नसल्यानं इंगोलेला अजून पाठपुरावा करण्यात रस नाही. त्याचीही अब्रू वाचवणं त्याला आता जास्त महत्वाचं वाटतं."
"ह्म्म. मग आता?" रमेश वकारकडे पाहत म्हणाला. तो अजूनही काहीतरी बोलायचा क्षीण प्रयत्न करत होता. रमेश त्याच्या तोंडातला बोळा काढणार एव्हढ्यात सिन्नरकरांच्या बोलण्यानं तो थांबला.
"एक केस आहे."
"कुठली?"
"मध्यंतरी शशिकला प्रकरण गाजलं होतं माहितीय?"
"थोडंफार."
"तर त्या टेपवाल्या शशिकलाचा मध्यंतरी खून झाला. बहुतेक सत्ताधारी पक्षाच्याच गुंडांनी केला. पण नेहमीप्रमाणे कोल्हेनं ती केस चोरी आणि त्यातनं घडलेली हत्या असा रंग देऊन बंद करायचा प्रयत्न चालवला आहे. पण एक लोकल रिपोर्टर आहे, सुवर्णा वकील म्हणून. तिनं मात्र हा खून असल्याचं सिद्ध करायचा चंग बांधलेला आहे. ती जिथे खून झाला त्या गावात तर फिरतेच लोकांना भेटत, पण इतरही बरेच पुरावे तिला मिळालेत."
"म्हणजे?"
"पोलिसातनं क्राईम सीनचे फोटोज तिच्यापर्यंत कसेतरी पोचलेत." सिन्नरकर गालातल्या गालात हसत म्हणाले.
रमेशदेखील क्षीण हसला. "तुम्ही कोल्हेला पोचवण्याचं फारच मनावर घेतलेलं दिसतं."
"करावं लागतं रमेश. फार वर्षं गप्प बसून काढली. बरं ते असो. तर तुम्ही तिला जाऊन भेटा."
"त्यापेक्षा मी कोल्हेवर दोन-तीन दिवस नजर ठेवतो. बाकी केसेस बंद झाल्यानं आता तो तिच्यावर एकाग्र होईल. त्याची पावलं कशी पडतात ते मी पाहतो."
"बरं ठीक. जसं तुम्हाला ठीक वाटतं. तिच्याशी संपर्क कसा साधायचा ते मी तुम्हाला सांगून ठेवतो." असं म्हणून सिन्नरकरांनी खिशातून एक कागदाचा तुकडा काढला आणि रमेशकडे पेन मागून त्यावर काही लिहू लागले.
"ह्याच्यावर ट्रॅफिकिंगची केस टाकता येईल. कोल्हे आता ह्याला वाचवण्याच्या फंदात पडायचा नाही. तुमच्या मर्जीतल्या एखाद्या ऑफिसरला पाठवा ह्याला घेऊन जायला." रमेश वकारसमोर बसत म्हणाला. वकार अजूनही काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता.
"ही घ्या संपर्क करण्याची पद्धत." सिन्नरकर कागद रमेशच्या हातात देत म्हणाले.
"बरीच गुंतागुंतीची आहे." रमेश कागदाची घडी करून खिशात ठेवत म्हणाला. मग त्यानं वकारच्या तोंडातला बोळा काढला. वकारला जोरात खोकल्याची उबळ आली. रमेशनं बाजूला पडलेली पाण्याची बाटली त्याच्या तोंडाला लावली. त्यानं घटाघटा पाणी प्यायलं आणि श्वास घेत बोलायला लागला.
"साहब. कोल्हेका पार्टी कोल्हेपे बहुत नाराज था साहब. आप चाहे तो मैं मलेशिया का पता देता हूं आपको।"
"काय?" रमेश अन सिन्नरकर दोघेही म्हणाले.
"हां साहब। वह मलेशियाकी पार्टी को बोला था की उधर पहुंचतेही उसका पती भी उधर आयेगा बोलके। लेकिन मेरा आदमी को एक लेटर दिया था उसको देने के वास्ते। वह लेटर पढके जोर जोरसे रोने और चिल्लाने लगी। मेरा आदमी पूछा तो बोली के पती के मौत की खबर भेजी थी। मेरा आदमी देखा तो डेड बॉडी का फोटो भी था। वह उधर बहुत गालीगलौज़ की, लेकिन कुछ उख़ाड़ नही सकती अभी।" वकारनं एका दमात सांगितलं.
सिन्नरकर आणि रमेश एकमेकांकडे पाहत राहिले. काय झालं असणार ह्याचा अंदाज दोघांनाही आला.
"ठीक है। पता देके रख हमको दोनोंका। मलेशिया और थायलंड। तेरी सजा थोड़ी कम हो इसका इंतजाम हम करेंगे, अगर ख़बर सही साब़ित हुई तो।" असं म्हणून रमेशनं त्याचा एक हात मोकळा केला आणि त्या हातात पेन आणि कागद दिला. त्याचं लिहून झाल्यावर त्याला परत बांधला आणि त्याच्या तोंडात परत बोळा कोंबला.
"हे मी बॅकअप लीड म्हणून ठेवतो. सध्या मी कोल्हे आणि सुवर्णा वकीलवर लक्ष ठेवतो. त्यातनं आधी काही हाती लागू शकेल." रमेश म्हणाला.
"जसं तुम्हाला योग्य वाटेल. मला काय हवंय ते तुम्हाला ठाऊक आहे. मी डीवायएसपी तिवारींना पाठवतो ह्याला ताब्यात घेण्यासाठी." सिन्नरकर खिशातून फोन काढत म्हणाले.
"एक मिनिट. इथे नको. त्यांना दोन गल्ल्या सोडून जे पार्क आहे तिथे पाठवा. मी तासाभरात ह्याला घेऊन तिथे पोचतो."


-----


"हा.." वल्लभकडे पाहून रेखाच्या चेहराभर आश्चर्य पसरलं.
"होय. हा तोच." असं म्हणत नरेंद्र पुढे झाला आणि तिच्या शेजारी टेबलवर बसला.
"पण जेलमधून निघाल्यावर जीवाला धोका आहे म्हणून सांगत होता ना हा." रेखा म्हणाली.
"होय. कारण त्याला आपल्यासोबत राहण्यासाठी कारण हवं होतं. पण मला आधीच थोडीफार कल्पना आली असल्यानं मी त्याला जवळ राहू दिला नाही."
रेखा काही बोलली नाही. कारण त्यावेळेस त्याला नक्की काय धोका आहे ते पाहूया असं रेखाला फार वाटत होतं, पण नरेंद्रनं त्याचं म्हणणं तेव्हा खरं केलं होतं. आणि तेच योग्य असल्याचं आत्ता लक्षात आलं होतं.
"एव्हढी काय जादू केली तिनं तुझ्यावर." नरेंद्र चहा पिता पिता रेखाला म्हणाला.
"जादू कसली. खरं खरं मनापासून बोलली माझ्याशी."
"ह्म्म."
"तू कोण होतास, काय होतास, कसा होतास सर्व सांगितलं मला."
"ह्म्म."
"तू सोडून का गेलास ते मात्र तिनं सांगितलं नाही मला. मला म्हणाली की ते तूच सांगायला हवंस."
नरेंद्र काही बोलला नाही. आणि चहाचा कप ठेवून उठला.
"काही खाऊन तर घे." कल्पना खोलीत शिरत म्हणाली.
"जास्त खाल्ल्यावर हालचाली मंद होतात."
"तुझी गुप्तहेरी माहिती तुझ्याजवळ ठेव. थोडंसंतरी खावंच लागेल तुला."
"तू इथे नक्षलवादी सेल चालवते आहेस की पाळणाघर?" नरेंद्र कुत्सितपणे म्हणाला.
"आम्ही बदललेले नक्षलवादी आहोत. आम्ही गावकर्‍यांचं रक्षण करतो आणि त्यांना मदत करतो." स्वयंपाकीण म्हणाली.
नरेंद्रनं एकदा तिच्याकडे, एकदा कल्पनाकडे आणि एकदा वल्लभकडे पाहिलं. आणि परत टेबलवर बसला.


-----


'आज का वार्ताहर' मध्ये काम करणार्‍या सुवर्णा वकीलचा ठावठिकाणा शोधणं फारसं अवघड नव्हतं. पंचविशीची धडाडीची मुलगी होती. परदेशातनं शिक्षण पूर्ण करून हट्टानं देशासाठी योगदान द्यायला आली होती. वयानं लहान असल्यानं आदर्शवाद अजूनही पक्का होता आणि त्याचमुळे शशिकला मर्डरची केस तिनं लावून धरली होती. शशिकलाशी तिचे चांगले वैयक्तिक संबंधही झालेले असल्यानं ही केस तिच्यासाठी फारच महत्वाची झालेली होती. कधी कॅमेरामनसोबत तर कधी एकटीच टेपरेकॉर्डर घेऊन ती फिरत असे. रमेश दोन दिवस तिच्यावर नजर ठेवून होता. कोल्हेच्या हालचालीही तो अधूनमधून मॉनिटर करायचा प्रयत्न करत होता. कोल्हे संशयास्पद लोकांना भेटून पैशाची काही सोय लावत होता. पण रमेशला आता त्यामध्ये इंटरेस्ट राहिला नव्हता. त्यानं त्या संशयास्पद लोकांची नोंद घेतली होती, पण आता कोल्हेला रंगेहाथ पकडणंच जास्त चांगलं पडलं असतं. त्यामुळे तो शांत होता. पण दोन दिवस उलटल्यावर मात्र कोल्हेनं शशिकला केसकडे नजर वळवली. गावातले दोन-तीन साक्षीदार छोट्या-मोठ्या गुन्ह्याखाली कोठडीत गेले आणि त्यांना थर्ड डिग्री देण्यात आली. आणि सुवर्णा काहीतरी रॅश डिसीजन घेईल ह्या भीतीनं रमेशनं कमिशनरांनी दिलेल्या पद्धतीनं विवक्षित ठिकाणी स्वतःच्या मोबाईल नंबरचा कागदाचा कपटा पोस्टपेटीत टाकला. त्यानंतर एका नंबरवरून एक विचित्र एसएमएस आला. मग त्या एसएमएसला ठराविक कोड वापरून एक वेगळा नंबर मिळाला. त्या नंबरवर फोन केल्यावर तिच्याशी तो बोलला आणि तिला भेटायचं निश्चित केलं. सीबीआयचा ऑफिसर इन्व्हॉल्व्ह होतोय म्हटल्यावर ती आनंदानं तयार झाली.
तिला प्रत्यक्ष भेटल्यावर रमेशला आपल्या धाकट्या बहिणीची प्रकर्षानं आठवण झाली. तशीच आदर्शवादी, मोकळ्या स्वभावाची पण तरीही ठाम. जे जे ऐकलं होतं आणि माहित झालं होतं तिची माहिती काढताना, ते सर्व होतंच पण त्याहूनही अधिक ती होती. नो वंडर, कोल्हेसारख्या बेरकी अधिकार्‍याच्याही तिनं नाकी नऊ आणले होते. रमेशनं सर्वप्रथम तिला थोडंसं सबुरीनं घ्यायला सांगितलं आणि मग तिला काय काय माहित आहे ते त्यानं माहित करून घेतलं. आणि कोल्हे धोकादायक मनुष्य असून मला लूपमध्ये घेतल्याशिवाय काही मोठं करू नकोस असा सल्लाही त्यानं तिला दिला. तिनं पटल्यासारखं निदान दाखवलं तरी. तिच्याशी बोलल्यानंतर रमेश आपल्या घरी पोचला, तेव्हा त्याच्या दाराशी एक छोटासा एन्व्हलप त्याची वाट पाहत होता.


-----


रेखा आणि नरेंद्र बंदूकधार्‍यांच्या मागोमाग बाहेर आले तेव्हा वल्लभ एका गाडीशेजारी उभा होता.
"सिरियसली?" नरेंद्रचा विश्वासच बसत नव्हता. "गाडी? एव्हढी मोठी? आणि तू म्हणतेस ह्याला आयएसआयची माहिती आहे."
"मला माहित आहे मी काय करतोय." वल्लभ म्हणाला, "ह्या बुधियाला इथल्या सगळ्या भागाची व्यवस्थित माहिती आहे आणि ही गाडी अगदी योग्य आहे, ज्या रस्त्यावरून आपल्याला जायचंय त्यादृष्टीनं."
"तू टॅक्सी बोलावली असतीस तरी चाललं असतं." असा टोमणा मारत नरेंद्रनं रेखाला गाडीत बसायची खूण केली.
कल्पना आणि रेखाची एकदा नजरानजर झाली आणि रेखा गाडीत बसली. पाठोपाठ नरेंद्र बसला.
"तू पेन्शनरांचं आयुष्य जगते आहेस. चांगलं आहे. गुड फॉर यू." असं म्हणून नरेंद्रनं कल्पनाला हात केला.
वल्लभ कल्पनाला सलाम करून गाडीत बसला आणि गाडी सुरू झाली.
"तुला जराही चांगलं वागवत नाही का तिच्याशी?" रेखा नरेंद्रला म्हणाली.
"मी चांगला माणूस नाहीये कुणाशी चांगलं वागायला."
"झालं पुन्हा सुरू तुझं?"
"मी कायम हेच म्हणत आलो आहे."
"मग काल रात्री ते काय म्हणालास मला?" रेखा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
नरेंद्र अस्वस्थ झाला. दोन मिनिटं शांतता पसरली. मग तो बोलू लागला.
"मला काल रात्री वाटलं होतं की आपण पुन्हा कदाचित भेटणार नाही."
"असं का वाटलं तुला?"
"कारण इथे आणताना आपल्या डोक्यांवर काळी फडकी टाकली नव्हती. त्याचा अर्थ आपल्याला येण्याजाण्याचा रस्ता कळला तरी त्यांना काळजी नव्हती. म्हणजे कदाचित.."
"पण ते खरंच होतं ना?"
"बरं ऐक. अजून काही बोलण्याआधी मला तुला सगळं काही सांगायचंय. अगदी सगळं. मी कल्पनाला भेटण्यापूर्वीचं आणि कल्पनाला सोडून गेल्यावर ते तुला भेटेपर्यंत सर्व काही."
"ऐकतेय मी."
नरेंद्र आजूबाजूच्या रस्त्यावर नजर ठेवून होता. पण ते जंगली रस्ते लक्षात ठेवणं कठीण होतं. त्यातच त्यानं रेखाला हळू आवाजात सांगायला सुरूवात केली.
"काल रात्री बोललो तसं.. माझं खरं नाव विवेक ..."


-----


रमेशनं आधी आजूबाजूला पाहिलं. मजल्यावर इतर कुणीही दिसत नव्हतं. त्यानं पाकीट उचललं आणि चटकन दरवाजा उघडून आत शिरला. आधी त्यानं दार लावून घेतलं आणि मग पाकीट उघडलं. त्यामध्ये त्याच्या मृत बहिणीचं ओळखपत्र होतं. आणि ओळखपत्रावर तिचं रक्त लागलेलं होतं.
रमेश जागीच कोसळला. जमिनीवर बसल्याबसल्या त्याला तीच जुनी दृश्य पुन्हा दिसायला लागली. त्याच्या बहिणीचा छिन्नविछिन्न मृतदेह. झुडपांमध्ये पडलेला. आणि त्यानंतर विराज आणि त्याच्या सुपिरियर्सनी घातलेला घोळ. त्यातनं चिघळलेला तपास. मग त्यानं स्वतः दाखवलेला भ्याडपणा. अब्रूचे धिंडवडे नकोत म्हणून दाबून टाकलेली केस. सगळं त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलं. आणि आता तिच्या खुन्याचा पत्ता आणि ओळख मिळेल ह्या स्वार्थापोटी तो राजे आणि डॉ. काळेंच्या खुनासाठी जवाबदार लोकांसाठी काम करत होता. कारण त्यांनी त्याला अशी बरीच कागदपत्र आणि फोटो दाखवले होते, जे त्यांना खुनी माहित असल्याची साक्ष देत होते. आणि मग ते ओळखपत्र. तिचं प्रेस रिपोर्टरचं ओळखपत्र. तिच्या रक्तानं माखलेलं. रमेश फक्त त्या दिवसाची वाट पाहत होता, ज्यादिवशी त्याला ती ओळख मिळेल. गेली आठ वर्षं तो केवळ ह्याच धक्क्याखाली जगत होता. किंवा जगत नव्हताच. एकदा बहिणीला न्याय तो देऊ शकला असता, तर त्यानंतर त्यानं उभ्या जगाविरूद्धही युद्ध केलं असतं. पण ते सगळं खूप दूर आणि खूप अवघड होत चाललं होतं. तो एका निरर्थक चक्रात अडकला होता आणि त्या ओळखपत्रामुळे तर अगदी पडद्याच्या पलिकडे खुनी उभा आहे आणि तो पडदा उघडू शकत नाही अशा विचित्र परिस्थितीत अडकला होता.
अचानक फोन वाजल्यामुळे तो भानावर आला.
"ऑफिसर. कोल्हेंनी मला आत्ता ग्रामपंचायतीच्या ऑफिसात भेटायला बोलावलं आहे." समोरून सुवर्णाचा आवाज आला.
"आत्ता?" रमेश घड्याळाकडे पाहत म्हणाला. रात्रीचे आठ वाजत होते.
"होय. फार महत्वाचं आहे म्हणाले."
"आत्ता नाही जमणार म्हणून सांगा."
"पण मी गावातच आहे."
"काय? पण संध्याकाळी तर मला इथे भेटलात तुम्ही."
"होय. त्यानंतर लगेच मी ह्या गावात आले."
"तरी नको म्हणून सांगा आज. कारण मला पोचायला अजून दोन तास लागतील."
"ठीक आहे ना. नका येऊ तुम्ही. मी भेटून घेते. घाबरायचं काय आहे त्यात. गावकरी आहेत ना."
"प्लीज काहीतरी अतिडेअरिंगबाज करू नका. आज नाही सांगा. किंवा दोन तासांनी भेटते म्हणून सांगा. मी लगेच निघतो."
"बरं." म्हणून तिनं फोन कट केला.
"बरं काय.. बरं काय?" म्हणून रमेश पुन्हा फोन लावायचा प्रयत्न करू लागला, पण फोन स्विच ऑफ झाला होता. 'हट्टी, मूर्ख मुलगी.' असं मनाशी म्हणत रमेश धडपडत उठला आणि पुन्हा घराबाहेर पडला.


जवळपास दीड तासांतच रमेश गावात पोचला, तेव्हा गाव चिडीचूप होतं. एखाद्या वैराण, रिकाम्या गावात आल्यासारखं वाटू लागलं त्याला. तो विचारण्यासाठी कुणीतरी शोधू लागला, पण कुणीच दिसेना. तो ग्रामपंचायतीचं ऑफिस शोधत निघाला, एव्हढ्यात त्याला कोल्हेची गाडी उभी दिसली. त्यानं बाईक बाजूला उभी केली आणि आजूबाजूला पाहू लागला. समोरच एका छोट्याशा घरवजा जागेत छोटासा दिवा पेटल्यागत दिसत होतं. तो त्या घराजवळ गेला आणि खिडकीतून वाकून पाहिलं तर कुणीच नव्हतं पण एक पर्स पडलेली दिसत होती. आणि अचानक त्याला क्षीण किंकाळी त्या घरामागून ऐकू आली. तो आवाजाच्या दिशेनं धावत निघाला. झाडंझुडूपं अंधारात तुडवत. त्यानं धावतानाच खिशातून टॉर्च काढली आणि त्या प्रकाशात पुढचा अंदाज घेऊ लागला. पुन्हा एक किंकाळी ऐकू आली गोळी चालवल्याचा आवाज आला, त्यापाठोपाठ अजून एक किंकाळी. रमेश एक क्षण स्तब्ध झाला आणि पुढच्या क्षणी जीवाच्या आकांतानं आवाजाच्या दिशेनं धावू लागला. थोड्याच अंतरावर झुडूपांमधल्या मोकळ्या जागेत तो कशावरतरी अडखळला आणि पडला. त्यानं पडलेली टॉर्च उचलून पाहिलं तर सुवर्णाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. रमेशचं अवसानच गळालं. त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी उफाळून आल्या, पण त्यानं क्षणात स्वतःला सावरलं आणि चहूकडे टॉर्च फिरवली. पण कुणीच नव्हतं. तो लगेच उठला आणि काही विचार करून पुन्हा त्या घराच्या दिशेनं धावू लागला. त्याच्या अंदाजाप्रमाणेच कोल्हे पुढे धावत होता. त्यानं कोल्हेला हाक मारल्याबरोबर कोल्हे थबकला आणि मागे वळला. त्याबरोबर त्याच्या चेहर्‍यावर रमेशच्या टॉर्चचा प्रकाश पडला. त्याक्षणी रमेशच्या डोक्यावर काय परिणाम झाला होता कुणास ठाऊक. त्या सगळ्या घटना, सुवर्णाचा त्याच्या बहिणीप्रमाणेच पडलेला मृतदेह, त्याच दिवशी मिळालेलं बहिणीचं रक्ताळलेलं ओळखपत्र आणि टॉर्चच्या प्रकाशात रक्ताचे थेंब उडालेला कोल्हेचा भेसूर चेहरा ह्या सगळ्याचा काही एकत्रित परिणाम घडला आणि त्यालाही कळायच्या आत रमेशनं एकामागोमाग एक सहा गोळ्या चालवल्या. कोल्हे उभ्या जागी कोसळला. रमेश पाच मिनिटं तसाच जागच्या जागी स्तब्ध उभा होता. पण मग हळूहळू पाय ओढत तो कोल्हेच्या कलेवराजवळ पोचला. तो निश्चेष्ट पडला होता. रमेशनं यांत्रिकपणे त्याची नस चेक केली आणि उठून तो स्वतःच्या मोटरसायकलकडे चालू लागला.
परतीच्या वेळेसही त्याला गावात कसलीही हालचाल दिसली नाही. तो घरी आला आणि सरळ बाथरूममध्ये गेला. शॉवर चालू करून त्याखाली न जाणे कितीतरी वेळ तो बसून राहिला.

क्रमशः

3 comments:

  1. मस्तच!! लवकर टाका पुढचा भाग.. :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. very interesting!!!pudhchya bhagachya pratikshet

    ReplyDelete